संसदेत ८१८ महिला खासदार

0
जागतिक महिला दिन  विशेष वृत्त *गेल्या ६६ वर्षात संसदेत ८१८ महिला खासदार**नवी दिल्ली दि ७* भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत गेल्या ६६ वर्षात ८१८ महिला खासदार निवडून आल्या आहेत, यामध्ये लोकसभेच्या ६३२ तर राज्यसभेच्या १८६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत गेल्या ६६ वर्षात २१ महिला खासदारांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे.सन १९५२ पासून आजतागायत देशात १० हजार ९७० खासदार निवडले गेले आहेत, यामध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांची संख्या ही ८८५५ इतकी आहे तर  २११५ खासदार राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
*महाराष्ट्रातून ४६ महिला खासदार लोकसभेत*
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते आजपर्यंत महाराष्ट्रातून ६८७ खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत, यामध्ये ४६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेवर आजतागायत निवडल्या गेलेल्या २११५ खासदारांपैकी महाराष्ट्रातून १५१ खासदार निवडले गेले, यामध्ये महाराष्ट्रातील १४ महिला खासदारांचा समावेश आहे.
*आजपर्यंत २१ महिला खासदार नामनिर्देशित*
राष्ट्रपतींनी आजपर्यंत देशातील १३३ खासदारांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले ,यामध्ये २१ महिला खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून आजपर्यंत ७ महिलांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे.
*सोळाव्या लोकसभेत सर्वाधिक ६५ महिला खासदार*
सध्याच्या १६ व्या लोकसभेत सर्वाधिक ६५ महिला खासदारांची नोंद झाली आहे, यामध्ये महाराष्ट्रातील ६ महिला खासदारांचा समावेश आहे. पंधराव्या लोकसभेतील एकूण ५६० खासदारांपैकी ६४ महिला खासदार होत्या. पहिल्या लोकसभेत ५४३ खासदार होते,यामध्ये २४ महिला खासदार होत्या. दुसऱ्या लोकसभेतही २४ महिला खासदारांचा समावेश होता.
*उत्तर प्रदेशातून सर्वाधिक १२१ महिला खासदार*
पहिल्या लोकसभेपासून ते आजपर्यंत उत्तर प्रदेश या राज्याने १३९४ खासदार लोकसभेवर निवडून दिले ,यामध्ये  १२१ महिला खासदारांचा समावेश आहे. पश्चिम बंगालने ६५, मध्यप्रदेश- ६२, बिहार- ५९, महाराष्ट्र- ४६, आंध्रप्रदेश- ४५, राजस्थान- ३०, गुजरात -२७, पंजाब- २४ ,तामिळनाडू- २३,ओडिशा- १६,  कर्नाटक १५, आसाम – १५, तर दिल्लीतून १३ महिला खासदार आजपर्यंत लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.
*नजमा हेपतुल्ला ६ वेळा राज्यसभेवर*
राज्यसभेवर सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदारांमध्ये श्रीमती नजमा हेपतुल्ला या ६ वेळा राज्यसभेवर निवडून आल्या आहेत, यापैकी त्या चार वेळा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. याबरोबरच श्रीमती अंबिका सोनी ( ५ वेळ), श्रीमती जया बच्चन (३ वेळ), श्रीमती रेणुका चौधरी ( ३ वेळ) श्रीमती झरणा दास, श्रीमती काझीमोनी, श्रीमती निर्मला सीतारामन, श्रीमती वानसुक,श्रीमती विप्लव्वा ठाकूर ( २ वेळ) यांचा समावेश आहे.

Leave A Reply