मोदींच्या अंताची सुरुवात ?

0
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मिडिया सल्लागार म्हणून काम पाहिलेले राजकीय विश्लेषक सुधिंद्र कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेला एक लेख काल वाचनात आला. २०१९ साली मोदी यांचा पराभव होणार असं भाकित करून कुलकर्णी यांनी त्याची मीमांसा केली आहे. त्यातील काही ठळक मुद्दे विचार करण्याजोगे आहेत.
कुलकर्णी म्हणतात, राजकीय वातावरणात बदल होताना अगोदर त्याची लक्षणं दिसायला लागतात. उदाहरणार्थ, २०१४ साली मोदी सत्तेवर येताना आधी मोदी लाट आली आणि नंतर आणि पाहता पाहता तिची त्सुनामी झाली. दहा वर्षात युपीए राजवटीला कंटाळलेली जनता, त्यात कथित भ्रष्टाचाराची प्रकरणं यामुळे बदलाची सारी लक्षणं स्वच्छ दिसत होती.
आता होत असलेले बदल आणि त्यांची लक्षणं सूक्ष्म आहेत. मोदी यांचे कट्टर समर्थक असलेले एक पत्रकार लिहितात, “जर मोदी यांची सत्ता गेली तर भारताला पुन्हा युपीएच्या वळणाने जावे लागेल”. इथेच खरी मेख आहे. जर मोदी यांची सत्ता गेली तर, हा विचार तरी  कुणाच्या मनात दीडदोन वर्षांपूर्वी येऊ शकला असता का? पराभूताची मानसिकता अशी नकळत व्यक्त होत असते.
कुलकर्णी यांच्या मते, बारकाईने पाहिल्यास हा बदल तीन टप्प्यांत होत असतो. आपण पुन्हा सत्तेवर येणार की नाही याबद्दल खुद्द सरकारचे जे समर्थक असतात त्यांच्याच मनात संशय निर्माण होतो. आत्मविश्वास डळमळीत झालेली ही माणसं अचानक थंड पडतात. दुसर्या टप्प्यात, कसंबसं अवसान आणून ती पुन्हा आक्रमक होतात. पण तोपर्यंत विरोधकांच्याही अंगात बळ आलेलं असतं आणि त्यांचा प्रतिहल्ला यांना झेपत नाही. गुजरात-राजस्थान मधे भाजपाला मिळालेला दणका, नीरव मोदी प्रकरणावर नरेंद्र मोदी यांचं मौन किंवा सोशल मिडिया वर आज मोदीभक्तांवर तुटून पडणारे लोक, ही त्याची समर्पक उदाहरणं आहेत.  तिसर्या टप्प्यात मग ही माणसं, मोदी नाही तर कोण, असा त्यांच्या दृष्टीने चलाख पण वास्तवात भाबडा प्रश्न विचारायला लागतात.
कुलकर्णी यांचं पुढचं विश्लेषण सुंदर आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेचं वाटोळं, धार्मिक आणि जातीय तणाव, गोमूत्र आणि  तत्सम जुनाट विचारांचं अवडंबर, नवनवे कर, सततचे दहशतवादी हल्ले, रोज मरणारे सैनिक, मोदींची तीच तीच नाटकी भाषणं, महागडे परदेश दौरे आणि आल्या गेल्या प्रत्येक विदेशी नेत्याला मारलेल्या मिठ्या याची शिसारी आलेले लोक पर्याय शोधायला लागतात.
कुलकर्णी शेवटी म्हणतात, मोदींच्या तुलनेत राहुल गांधी हळूहळू सरस ठरतो आहे. त्याचं साधं राहणीमान, आधुनिक विचारसरणी, कुटुंबाकडून उपजत आलेले संस्कार आणि शिष्टाचार, नम्रपणा, इतरांकडून नवं शिकण्याची वृत्ती, त्याची निरागसता आणि शांतपणे पण खंबिररित्या त्याने मोदींविरुद्ध उभारलेला लढा यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. लोकसभा निवडणुकांना अजून एक वर्ष आहे. तेवढा काळ राहुल गांधी याला पर्याय म्हणून वर यायला पुरेसा आहे.कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश इथे काँग्रेसच सत्तेवर येणार आणि तिथूनच मोदी यांच्या अंताची सुरूवात होणार असं कुलकर्णी यांचं ठाम मत आहे.
मीनु सोनार। fb.

Leave A Reply