*नवपेशवाईला काकडा*

0

*(लेखक : ज्ञानेश महाराव संपादक, साप्ताहिक चित्रलेखा)*
जुनी मढी उकरून काढू नका असा शहाणपणा शिकवणार्‍यांचा सत्य इतिहास जाहीर झाल्यावर ते कशा प्रकारे हिंसक थयथयाट घडवून आणतात, ते ताज्या भीमा-कोरेगाव प्रकरणाने दाखवून दिलंय. दुसर्‍या बाजीरावच्या काळातल्या अमानुषी अस्पृश्यतेच्या असह्य ओझ्याने अपमानित झालेल्या तेव्हाच्या महार शूरवीरांनी ब्रिटिशांना साथ दिली आणि पेशवाई संपवून टाकली. (त्याचा तपशील मागील अंकातील आजकालमध्ये आहे.) या पराक्रमाचं वर्णन आंबेडकरी जलशातले गायक मोठ्या जोशात सादर करताना म्हणतात –
*महाराची तलवार, शूरवीरांची तलवार, फिरे गरगरा**शेंडीसकट कापला, बाजीरावचा तुरा-*
या घटनेला यंदाच्या १ जानेवारीला २०० वर्षं पूर्ण झालीत. या घटनेची साक्ष देणारा जयस्तंभ भीमा-कोरेगावला आहे. त्याला वंदन करण्यासाठी १ जानेवारीला नगर-नाशिक-औरंगाबाद, मुंबई, ठाणे, पुणे परिसरातून पूर्वाश्रमीचे महार असलेले बौद्धजन मोठ्या संख्येने पुणे-अहमदनगर मार्गावरील भीमा-कोरेगावला येतात. त्यांची संख्या गेल्या २०-२५ वर्षांत वाढतेय. या भीमसैनिकांना श्रमपरिहारासाठी आवश्यक ती सेवा, मदत मराठा-बहुजन समाजाच्या संस्था-संघटना, लोक देत होते. या मार्गावरील दुकानंही धंदा जास्त होतो, म्हणून सेवेसाठी उघडी असायची. पण या सेवाभावाने यावेळी पाठच फिरवली नाही, तर जयस्तंभाला वंदन करण्यासाठी येणार्‍या आंबेडकरी जनतेवर तुफान दगडफेक केली. त्यांची वाहनं जाळली. या हल्ल्यात अनेक आंबेडकर अनुयायी जखमी झाले. एकाचा जीव गेला. अशा हल्ल्यात आणि अमरनाथ यात्रेकरूंवर होणार्‍या नापाकांच्या हल्ल्यात काडीमात्र फरक नाही. काश्मिरी युवक पोलिसांच्या आडोशाने भारतीय जवानांवर दगडफेक करतात, म्हणून तिथल्या पोलिसांना देशभरातील नागरिक शिव्या-शाप देतात. तेच योग्य आहे. भीमा-कोरेगावातही भीमसैनिकांवर पोलिसांच्या साक्षीने दगडफेक झाली. त्याचे गोडवे गायचे का ? हा अमानुषपणा जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा देत करणं, हा छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा अपमान आहे.

                  शिवरायांनी मोहिमेवर जाणार्‍या मावळ्यांना ‘मार्गावरील शेतकर्‍याच्या पिकाच्या देठा-पानालाही हात लावू नका,’ अशी आज्ञा केली होती. मावळ्यांनी ती पाळली, म्हणून स्वराज्य निर्माण झालं. त्या देठा-पाना इतकीही किंमत जर वर्ण्यवर्चस्ववाद्यांनी स्वार्थासाठी कनिष्ठ-मागास ठरवलेल्या लोकांप्रती नसेल, तर तो शिवद्रोह आहेच; पण संविधानानुसार, राष्ट्रद्रोहही आहे. तो भावनेच्या भरात घडलेला नाही. त्यात योजकता आहे. त्यानुसारच जयस्तंभाकडे जाणार्‍या रस्त्याकडच्या घरात-इमारतीत बौद्धजनांवर फेकण्यासाठी दगड-गोटे जमा करून ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे संभाजीराजांची समाधी असलेल्या भीमा-कोरेगाव मार्गावरील वडू-बुद्रूक गावात दलित-मराठा असा वाद घडवून आणण्यात आला. औरंगजेबाने संभाजीराजांना कपटाने पकडून आणल्यावर त्यांना देहान्ताची शिक्षा दिली. त्याविरोधात प्रजेने उठाव करू नये, यासाठी क्रूर औरंगजेबाने अत्यंत नीचपणे संभाजीराजांच्या मृतदेहाची अवस्था छिन्न-विच्छिन्न करून ठेवली. तथापि, ही छिन्न-विच्छिन्नता वैदिक पद्धतीनुसार करण्यात आली होती, असं प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांचं म्हणणं आहे. संभाजीराजे हे संस्कृत भाषा पंडित होते. त्यांनी बुद्धभूषणप्रमाणे संस्कृत भाषेत पाच ग्रंथ लिहिलेत. संस्कृत भाषा अवगत असल्यामुळे संभाजीराजांना, शिवरायांच्या राज्यभिषेकाला विरोध करणारे ब्राह्मण धर्ममार्तंड आपलं वर्ण्यवर्चस्व गाजवण्यासाठी कोणते दाखले पुढे करतात, काय बोलतात, ह्याची माहिती होती. या धर्ममार्तंडांना अष्टप्रधान मंडळातील ब्राह्मण कसे वापरतात व आपलं महत्त्व वाढवतात, त्यांचा अंदाज संभाजीराजांना आला होता. म्हणून त्यांनी या प्रधानांना शिवरायांच्या भर दरबारात लबाड म्हटलं होतं. त्याचा या लबाडांनी सूड घेण्याचा प्रयत्न संभाजीराजे ‘छत्रपती’ झाल्यावर केला. तरीही त्यांना शिवरायांचे निष्ठावंत सेवक म्हणून संभाजीराजांनी एकदा माफ केलं. ह्याच दरम्यान, औरंगजेबाचा एक मुलगा सुलतान अकबर बापाला कंटाळून संभाजीराजांना शरण आला होता. त्याच्याशी ‘या’ लबाडांनी संगनमत करून संभाजीराजांवर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. तो पत्रव्यवहारामुळे उघड्यावर आला. यावेळी मात्र संभाजीराजे कठोर झाले आणि त्यांनी अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी या कारभार्‍यांना हत्तीच्या पायदळी देहान्ताची शिक्षा दिली आणि शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातले मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांना वयस्कर म्हणून कोठडीत घातलं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. तथापि, त्यांनी संभाजीराजांविरोधात पोसलेली जातिनिष्ठ कीड जिवंतच होती. त्यांच्या हरामखोरीमुळेच संगमेश्वरला संभाजीराजांना पकडण्यात मुकरबखान यशस्वी झाला आणि औरंगजेबाकरवी संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार देहान्ताची शिक्षा देण्यास हरामखोर यशस्वी झाले.

            मनुस्मृतीनुसार, जो ब्राह्मणेतर संस्कृत वाचेल, त्याचे डोळे फोडायचे; संस्कृत ऐकेल त्याचे कान तप्त लोहरस घालून फोडायचे; जो संस्कृत बोलेल त्याची जीभ हासडायची. संभाजीराजांच्या मृतदेहावर हे तीनही सोपस्कार झाले, म्हणून त्याला शरद पाटील यांनी वैदिक देहदंड म्हटलंय. अशा छिन्न-विच्छिन्न मृतदेहास वडू-बुद्रूक येथे टाकून देण्यात आले. पण ‘संभाजीराजांच्या शवास हात लावल्यास शिरच्छेद केला जाईल’ अशी जाहीर दवंडी पिटल्यामुळे शव घेण्यास कुणी पुढे येईना. परंतु, गोविंद गोपाळ महार हे जीवाची पर्वा न करता हिंमतीने पुढे आले आणि त्यांनी संभाजीराजांबरोबरच कवि कलशच्या मृतदेहावरही अंत्यसंस्कार केले. त्यांच्या समाध्या बांधल्या. तर गावातल्या शिवले-देशमुख या मराठ्यांचं म्हणणं, ‘आम्ही मूळचे शिर्के; परंतु, संभाजीराजांचा छिन्न-विच्छिन्न मृतदेह आम्ही नीटपणे शिवून त्यावर अग्निसंस्कार केले, म्हणून आमची ओळख शिवले-देशमुख अशी झाली.’ या दोन्हीतील ‘शिवले’ आख्यायिका अलीकडच्या काळात पुढे आलीय. मात्र तिच्याबद्दल अधिकृत संशोधन नाही. या उलट, गोविंद गोपाळ महार यांचा उल्लेख अनेक इतिहास संशोधकांच्या पुस्तकात आहे. विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीत आहे. इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांच्या समाधी संशोधनातून पुढे आलेल्या गोविंद गोपाळ महार यांच्या कार्याचा उल्लेख संभाजी महाराजांच्या समाधीपाशी जो फलक होता, त्यावर गेली ४०-४५ वर्षं होता. तो फलक दोन वर्षांपूर्वी बदलताना त्यातून गोविंद गोपाळ महार यांचा उल्लेख स्मारक समितीने वगळला आणि त्या जागी ‘शिवले ग्रामस्थ’ असा उल्लेख आला. या फेरफारात भीमा-कोरेगावची दंगल आणि महाराष्ट्र बंदचे मूळ आहे. हा फेरफार आपल्या उचापतीतून ब्राह्मणांना बदनाम करणारे पुण्यातले मिलिंद एकबोटे आणि मराठा-बहुजन तरुणांची वाट दौडीत आणि दंगलीत बरबाद करणारे सांगलीचे संभाजी भिडे यांनी घडवून आणला, असे आरोप होत आहेत.

                    भिडे आपल्या जाज्वल्य साजूक भाषणात कुणाच्या तरी ‘बोच्याला काकडा’ लागल्याचा सोवळी उल्लेख करीत असतात. पण वडू प्रकरणातून घडवलेल्या कोरेगाव दंगलीने फडणवीस सरकारवर एकबोटे-भिडे यांच्या ढुंकणाला काकडा लावण्याची वेळ आणली आहे. कारण वडूत जे घडलं, ते या दोघांशी संबंधित असल्याचं पुढे येतंय. संभाजीराजांच्या स्मारका पुढच्या फलकात बदल करण्यापूर्वी तिथे असलेला गोविंद महार यांचा स्मृती दगडही हलवण्यात येऊन तो बौद्धवाड्याजवळ नेण्यात आला. वडू गावात बौद्धांची १२-१४ घरं आहेत. ते गोविंद महार यांचे वंशज आहेत. ते ‘गायकवाड’ हे आडनाव लावतात. बाकी गावात शिवले-देशमुख, अरगडे, भंडारे या आडनावाची २५०-३०० घरं आहेत. हे सगळे मराठा नाहीत. त्यात ओबीसी आहेत. बौद्ध वगळून मागासवर्गीयही आहेत. पण या सगळ्यांच्या भेज्याचं एकबोटे-भिडे यांच्या विचाराने भटीकरण झालंय. त्यामुळे त्यांना ‘संभाजीराजांच्या मृतदेहाची विटंबना मनुस्मृतीला साजेशी का करण्यात आली,’ हा मूलभूत प्रश्न सतावत नाही. तो पडू नये, यासाठीच त्यांना वापरलं जातंय. त्यानुसारच, पेशवाई संपवण्यास कारण ठरलेल्या महार सैनिकांच्या शौर्यदिनाच्या २००व्या सोहळ्या निमित्ताने होणार्‍या पेशवाईच्या नादानीची चर्चा टाळण्यासाठी आणि विजयस्तंभाचं महत्त्व वाढवणार्‍या आजच्या बौद्धांना अद्दल घडवण्यासाठी २९ डिसेंबरला वडू गावातील गोविंद महार यांच्या समाधीची नासधूस करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी नाशिकच्या तरुणांनी गोविंद महार यांच्या स्मृती दगडाभोवती सिमेंटचा चौथरा बांधला आणि त्यावर फायबरची छत्री बांधली. १ जानेवारीला बौद्धजन मोठ्या संख्येने भीमा-कोरेगावला येतात. ते तिथल्या जयस्तंभाला वंदन करून झाल्यावर जवळच असलेल्या वडू गावात जाऊन संभाजीराजांच्या आणि गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीचंही दर्शन घेतात. हे लक्षात घेऊन यावेळी तीन दिवस आधी गोविंद महार यांच्या समाधीची नासधूस करण्यात आली. त्याने वडू गावात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी गावातील ४९ तरुणांवर ऍट्रॉसिटीची केस दाखल करण्यात आली. ते सगळे मराठा समाजातील आहेत, अशा बातम्या पेरण्यात आल्या. त्या चुकीच्या आहेत. यात मराठ्यांसह ओबीसी, चर्मकार, रामोशी, मातंग समाजातीलही तरुण आहेत. तथापि, ऍट्रॉसिटीच्या बातमीने वडू ते भीमा-कोरेगाव परिसरातील मराठा व अन्य बहुजन समाज खवळला आणि शौर्यदिनी अभिवादन करण्यासाठी येणार्‍यांवर दगडफेक करू लागला. शिवराय-संभाजीराजांच्या मावळ्यांनी निःशस्त्र लोकांवर असला भेकड गनिमी काव्याचा प्रयोग कधी केला नव्हता. यातून मावळ्यांच्या भेज्यात वळवळणच्या पेशवाई कीडीचंच प्रदर्शन घडलं. पेशवाईतल्या नालायकीचं समर्थन करणारे नामानिराळे राहिले आणि मराठे दंगलखोर झाले. पेशवाईचा गौरव सांगताना, पेशवे अटकेपार गेले असं ऐकवलं जातं, तर सहकुटुंब सहलीला जावं, तसे पानिपताच्या लढाईला गेलेले पेशवे हरले; ते मात्र ‘मराठ्यांचे पानिपत’ झाले, असं सांगितलं जातं. आपली ब्राह्मणी नालायकी लपवण्याचा सराईतपणा पेशवाई संपून २०० वर्षं झाली, तरी टिकून आहे. त्यातल्या लबाड्या भीमा-कोरेगाव प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी नेमकेपणे टिपून जाहीर केल्याने, एरवी भिडे-एकबोटेंच्या भटी नाचकामाला ‘हिंदुत्वाचं तांडव’ म्हणणारे मराठेही मोठ्या प्रमाणात या दलित विरोधी दंगलीपासून दूर राहिले. हा शहाणपणाच नवपेशवाईला काकडा लावणारा ठरेल !
*(अशा सणसणीत माहितीचे लेख आणि रिपोर्ट वाचण्यासाठी आताच आणा-साप्ताहिक चित्रलेखा-सर्वत्र उपलब्ध)*

Leave A Reply