दिवाळीचा देव – कुबेर

0

डॉ.अशोक राणा

दिवाळी हा आनंदाचा ठेवा घेऊन येणारा सण. या सणाला लक्ष्मीपूजन या नावानेही ओळखले जाते. लक्ष्मी ही धनाची देवता म्हणून या दिवशी पूजिली जाते. शेतीतील कोरडवाहू ,खरीप किंवा जिराईत या नावांनी ओळखले जाणारे पीक या दरम्यान शेतकऱ्यांच्या घरात येते. या पिकालाच लक्ष्मी मानून शेतकरी आनंदाने हा सण साजरा करतात. कारण, की पिकाच्या विक्रीतून आपल्या हाती पैसा खेळणार याचा आनंद त्यांना होत असतो. व्यापारी तर धनाचे पुजारीच असतात. त्यांच्या दृष्टीने आश्विनी अमावस्या ही अतिशय मंगलदायक असते. एरव्ही अमावस्येला अशुभ मानणारे व्यापारी या अमावस्येला मात्र सर्वात शुभ मानून लक्ष्मीपूजन करतात आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला आपल्या नव वर्षाचा प्रारंभ करतात. शेतकऱ्यांचे पोळ्यासकट बहुतांश सण अमावस्येलाच येतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने अमावस्या ही शुभच असते. दिवाळी हा अशारितीने शेतकरी आणि व्यापारी या दोन्ही वर्गांचा सर्वात मोठा सण मानला जातो..
आज जरी या दिवशी लक्ष्मीपूजन होत असले तरी ही परंपरा खूप जुनी नाही, तर ती सुमारे इ.स.च्या चवथ्या-पाचव्या शतकात सुरू झाली. भारताच्या उत्तर भागात प्रयाग म्हणजेच आजच्या अलाहाबाद जवळील कौशंबी येथे ई.स.तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात गुप्त राजवट अस्तित्वात आली होती. या राजवटीत चवथ्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेला समुद्रगुप्त हा राजा विष्णुपूजक होता. विष्णूला आपले आराध्यदैवत मानणारे ते वैष्णव होत. गुप्त राजवट वैष्णव पंथाला मानणारी असल्यामुळे त्यांच्या काळात या पंथाला राजाश्रय मिळाला. प्रारंभी केवळ मगध म्हणजे आजच्या बिहारपर्यंतच मर्यादित असलेली गुप्त राजवट या वंशातील राजांच्या पराक्रमामुळे संपूर्ण उत्तर भारतात पसरली. एवढेच नव्हे तर दक्षिणेतील कांजीवरमच्या राजालाही त्यांनी आपले मांडलिक बनविले. त्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांचा अंमल सुरू झाला. इ.स.३२० ते ५५० पर्यंत या राजवटीने आपला प्रभाव भारतीय संस्कृतीवर पाडला. त्यांनी आश्विनी अमावस्येच्या रात्री विष्णुपत्नी मानलेल्या लक्ष्मीच्या पूजनाची परंपरा सुरू केली. लक्ष्मीपूजन हे नाव त्यामुळेच दिवाळीच्या सणाला पडले. त्यापूर्वी या सणाला यक्षरात्र या नावाने संबोधले जात असे. तसेच या दिवशी यक्षांचा राजा कुबेर याची पूजा होत असे. पौराणिक वाङ्मयात कुबेर हा देवांचा भांडारी म्हणजे धनाचा रक्षक म्हणून चितारलेला दिसून येतो. परंतु, तो मुळात यक्षांचा राजा होता. त्याच्या विषयी वैदिक आणि पौराणिक वाङ्मयात वेगवेगळी माहिती आढळून येते. तिचा परामर्श या ठिकाणी थोडक्यात घेऊया.
यक्षांचा राजा कुबेर
भारतातील सर्वात जुनी संस्कृती म्हणजे यक्ष संस्कृती होय. या संस्कृतीत निसर्गाला पूजनीय मानले जात असे. वृक्ष आणि पाणी यांना दैवत मानून त्यांची आराधना करणे हे या संस्कृतीचे एक वैशिष्ठ्य होय. आजही आपण निसर्गातील अनेक घटकांना आराध्यदैवत या नात्याने पूजतो,हा आपणावरील यक्ष संस्कृतीचा प्रभाव आहे. वड,पिंपळ,कडूनिंब,आवळा इ.वृक्षांची पूजा यक्ष संस्कृतीतून चालत आलेली आहे. निसर्गाचे रक्षक या नात्याने यक्ष निसर्गपूजक म्हणून ओळखले जातात. त्यांचा उल्लेख राक्षस,गंधर्व,किन्नर,अप्सरा,किंपुरुष,विनायक,नाग इ.मानवी समूहांसोबत येतो. यक्षांची राजवट प्राचीन भारत आणि प्राचीन श्रीलंका या देशांमध्ये होती,असे म्हणतात.
वेदामध्ये कुबेर पाताळ लोकामधील आत्म्यांचा स्वामी आणि अंधकाराचा राजा असल्याचा उल्लेख येतो. यावरून त्याचा नागलोकांशी असलेला संबंध सूचित होतो. नाग या मानवी समूहाचे म्हणजे ज्यांचे कुलचिन्ह नाग आहे असे लोक जलरक्षक आणि यक्ष हे वृक्षरक्षक होते. त्यांचे निवासस्थान पाताळ म्हणजे जेथे पाणी संपून जमीन सुरु होते तो प्रदेश होय. त्यालाच इतिहासाचार्य राजवाडे यांनी नागलोक असे म्हटले आहे. त्यांच्या मते हा प्रदेश म्हणजे आजचे कोंकण होय. परंतु कुबेराचे राज्य हिमालयाच्या परिसरातील अलकापुरीत होते असे प्राचीन ग्रंथांमध्ये म्हटलेले आहे. तेथून पाताळापर्यंत त्याची राजवट असावी असे या आधारे म्हणता येईल. प्राचीन ग्रंथांच्या आधारे आपण फक्त त्याविषयी अंदाज व्यक्त करू शकतो. कुबेराविषयी प्राचीन वाङ्मयांमध्ये आलेल्या वर्णनामध्ये त्याच्या माता-पित्यांचे उल्लेख वेगवेगळे आहेत. महाभारतात वैवस्वत मन्वंतरातील पुलस्त्यपुत्र विश्रवस ऋषींचा पुत्र म्हणून कुबेराचा उल्लेख येतो. तसेच त्याच्या आईचे नाव ‘गो’ असल्याचे महाभारतकार म्हणतो. तर पौराणिक साहित्यात त्याच्या मातेचे नाव ‘इडविडा’ किंवा ‘इलविला’, ‘इडविला’ तसेच ‘मंदाकिनी’ असे आलेले आहे. त्यावरून कुबेराला ‘ऐडविड’ किंवा ‘ऐलविल’ असे नाव प्राप्त झाले होते. मातृसत्ताक संस्कृतीच्या लेखकांनी त्याला वरील नावांनी उल्लेखिलेले आढळून येते. याउलट,पुरुषसत्ताक संस्कृतीच्या लेखकांनी पित्याच्या नावावरून त्याला ‘वैश्रवण’ म्हणून संबोधले आहे,तर त्याची अनेक नामांतरे त्याच्या वैशिष्ठ्यावरून बेतलेली आहेत.
कुबेराचे एक नाव सोम असे होते. त्यावरून त्याच्या दिशेला म्हणजे उत्तरेला ‘सौम्या’ असे नाव पडले. तो नरयान म्हणजे पालखीमध्ये बसून फिरत असे,म्हणून त्याला ‘नरवाहन’ असे म्हणतात. राजांचा राजा असल्यामुळे त्याला ‘राजराज’ ही पदवी मिळाली होती. यक्ष आणि राक्षसांचा राजा असल्यामुळे त्याला ‘यक्षराज’,’यक्षाधिपती’,’यक्ष-राक्षसभर्ता’ इ.शब्दांनी संबोधलेले दिसून येते.पौराणिक साहित्यात कुबेर हा देवांचा कोषाध्यक्ष या नात्याने दाखविला असल्यामुळे त्याला ‘धनाधिप’,’धनेश्वर’,’धनपती’ या पदव्या प्राप्त झाल्या आहेत. कैलास पर्वतावरील अलका नगरीचा राजा असल्यामुळे त्याला ‘अलकाधिप’ म्हणतात. त्याला ‘एकाक्षपिंगलिन’ या नावाने संबोधले जात असे. वाल्मिकी रामायणात त्याला एकच डोळा असून तो पिंगट रंगाचा होता,त्यामुळे त्याला हे नाव प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. त्याविषयीची कथा सांगताना रामायणकार म्हणतो की,पार्वतीकडे एक डोळा किलकिला करून त्याने पाहिले. त्यामुळे त्याचा एक डोळा नष्ट झाला आणि उजवा डोळा पिंगट बनला. कुबेराच्या उपासनेला ओहोटी लागल्यानंतर अशा कथा तयार गेल्या असाव्यात. वाल्मिकी रामायण आणि महाभारतात कुबेराला रावणाचा सावत्र भाऊ म्हणून चित्रित केलेले आहे. रामायणातील कथेनुसार कुबेराने आपला पिता विश्रवस याच्या सेवेसाठी पुष्पोत्कटा,राका आणि मालिनी या तीन राक्षसकन्या त्याला अर्पण केल्या. त्यापैकी पुष्पोत्कटा व विश्रवस यांचा पुत्र रावण होय. ब्रह्मदेवाकडून कुबेराला मिळालेले लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान रावणाने हिसकावून घेतल्याचा उल्लेख रामायणात येतो. त्याविषयी म.म.सिद्धेश्वरशास्त्री चित्राव म्हणतात की,” कुबेराचा निर्देश प्राचीन पौराणिक साहित्यात आढळतो,तसा रावणाचा आढळत नाही. म्हणूनच वाल्मिकी रामायणातील उपरोक्त आख्यायिका कल्पनारम्य आणि रावणाचे महत्त्व वाढविण्याच्या हेतूने रचली असण्याची शक्यता वाटते.”
कुबेराचे निवासस्थान
महाभारतात कुबेराला ब्रह्मदेवाच्या कृपेने लंकेचे राज्य मिळाले होते,परंतु त्याचा सावत्र भाऊ असलेल्या रावणाने ते त्याच्याकडून हिरावून घेतले असा उल्लेख येतो. याउलट वाल्मिकी रामायणात त्याने स्वतःहून लंकेचे राज्य रावणाला दिल्याचे म्हटले आहे. रामायणातील एका उल्लेखानुसार तो उत्तरदिशाधिपती असून या दिशेमधील यक्षलोकात राहात असे. कुबेर कैलास पर्वतावर राक्षस आणि अप्सरा यांच्यासोबत राहत असे. तसेच या पर्वतावरील सौगंधिक नावाचे एक वन त्याच्या मालकीचे होते असा उल्लेख भागवतात आढळतो. याच ग्रंथात मेरू पर्वताच्या उत्तरेस असणाऱ्या ‘विभावरी’ नावाच्या ठिकाणी तो निवास करीत असल्याचा निर्देश आला आहे. वायू पुराणातील संदर्भानुसार कुबेर हा अलकानगरीचा सम्राट होता आणि त्याच्या आधिपत्याखालील प्रदेशात यक्ष,राक्षस,पौलस्त्य,अगस्त्य इ.लोक राहत असत. त्यामुळे त्याला ‘अलकाधिप ‘ या पदवीने संबोधले जात असे. वायु पुराणातच कुबेराचे निवासस्थान कैलास पर्वताच्या दक्षिण भागात असणाऱ्या वैद्युत पर्वतामध्ये असल्याचा उल्लेख येतो. या पर्वताच्या तराईतील मानस सरोवर हे कुबेराचे आवडते क्रीडास्थान असून या सरोवराच्या काठावर असणाऱ्या वैभ्राज नावाच्या दिव्य वनामध्ये कुबेराचा सेवक प्रहेतृपुत्र ब्रह्मधान नावाचा राक्षस रहात असे. या माहितीवरून यक्ष आणि राक्षस यांच्यामधील परस्पर संबंधाची कल्पना येते. पद्मपुराणात कुबेर हा राक्षस गणासोबत गंधमादन पर्वताच्या शिखरावर निवास करीत होता असा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे या पर्वतावरील संपत्तीपैकी चवथा भाग त्याच्या मालकीचा असून त्यापैकी सोळावा भाग त्याने पृथ्वीवरील मानवांना दिला होता अशी माहिती येते. भविष्यपुराणात कुबेर सूर्याच्या उत्तर दिशेस असणाऱ्या प्रदेशामध्ये निवास करीत असल्याचा उल्लेख येतो. अशारितीने अनेक ग्रंथांमध्ये कुबेराच्या निवासस्थानाविषयी उलट सुलट माहिती नोंदविलेली दिसून येते. त्यापैकी काही संदर्भावरून त्याचा हिमालय पर्वताशी असलेला संबंध सूचित होतो. त्यावरून तो त्या परिसरातील यक्ष या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन जमातीचा नेता होता असा निष्कर्ष काढायला बराच वाव आहे. त्याच्या राज्यपद्धतीविषयीही काही संकेत प्राचीन ग्रंथांमध्ये सूचित केलेले आहेत.
कुबेराची राज्यपद्धती
महाभारतात ‘कुबेरसभा’ या नावाने त्याच्या राजदरबाराचा उल्लेख येतो. त्यामध्ये कुबेर ऋद्धी आणि इतर स्त्रियांसोबत विराजमान होत असे. या स्त्रियांपैकी ऋद्धी आणि वृद्धी या दोन स्त्रिया कुबेराची शक्ती या नात्याने कार्य करीत असत, असा उल्लेख वाल्मिकी रामायणात येतो. ही नावे प्रतिकात्मक असली तरी त्यामधून त्याच्या राज्यकारभारात स्त्रियांना मानाचे स्थान होते असे दिसून येते. प्राचीन मातृसत्ताक पद्धतीचा निर्देश यामधून मिळतो. (त्याचप्रमाणे आजच्या गजमुख गणेशाचा कुबेराशी असलेला संबंध सूचित होतो. त्याच्याही पत्नी म्हणून ऋद्धी आणि सिद्धीचा उल्लेख होतो. त्यामुळेच गणेशाला सिद्धिविनायक हे नाव प्राप्त झाले. गजाननाच्या मूर्तीचेही कुबेराप्रमाणे सुटलेले पोट आणि आखूड हात पाय दाखविले जातात.) राज्य कारभारात सैन्याचे स्थान महत्त्वाचे असते,तसेच सेनापतीचेही. कुबेराचे सेनापती म्हणून यक्ष कार्यरत असत असा उल्लेख देवी भागवतात येतो. या यक्षांची नावे १.मणिभद्र, २.पूर्णभद्र, ३.मणिमत, ४.मणिकंधर, ५. मणिभूष, ६. मणिस्त्रग्विन, ७. मणिकार्मुकधारक अशी या ग्रंथात नोंदविली आहेत.
प्रचलित समजुतीनुसार कुबेर हा देवांचा धनरक्षक होता. हे पद प्राप्त करण्याकरिता त्याने सरस्वती नदीच्या काठी कठोर तपस्या केली होती असा उल्लेख महाभारतात येतो. त्यावर खूष होऊन ब्रह्मदेवाने त्याला कुबेर बनण्याचा आशीर्वाद दिला आणि त्याला वर प्रदान केलेत,ते असे- १.यक्षांचे आधिपत्य, २.राजराजत्व, ३.धनशत्व, ४.अमरत्व, ५.लोकपालत्व, ६.रुद्राशी भिन्नत्व. त्याचबरोबर राक्षस गणांच्या ताब्यात असलेले लंकेचे राज्य,पुष्पक विमान आणि नलकुबर इ.पुत्र प्रदान केलेत. या माहितीत ब्रह्मदेवाचे महत्त्व वाढवून कुबेराचे कर्तृत्व नाकारले गेले आहे. कुबेराने तपस्या केली त्या स्थानाला ‘कुबेरतीर्थ’ किंवा ‘कौवेरतीर्थ’या नावाने संबोधले जाते. शिवपुराणात कुबेराने आपल्या तपस्येच्या स्थानी अलकावती नगर वसविले असा उल्लेख येतो. पद्म पुराणात यक्षांचा प्रभाव वाढण्याकरिता कुबेराने कावेरी आणि नर्मदा या नद्यांच्या संगमावर शिवाची आराधना केली होती असा उल्लेख आला आहे. त्यावरून कुबेराची राजवट प्राचीन भारताच्या दक्षिणेपर्यंत विस्तारली होती हे दिसून येते.
एक आदर्श राज्यकर्ता या नात्याने कुबेर हा परम दयाळू यक्षराज असल्याच्या आख्यायिका महाभारतात आढळतात. एका कथेनुसार हिमालय पर्वतात अस्त्रप्राप्तीकरिता शिवाची तपस्या करणाऱ्या अर्जुनाला कुबेराने वरुणासोबत दर्शन दिले होते. त्याचप्रमाणे त्याला ‘अंतर्धानास्त्र’ नावाचे दिव्य अस्त्रही दिले होते. अस्त्र आणि शस्त्र यामध्ये फरक आहे. शस्त्रावर स्वार होणारे ते अस्त्र होय. अस्त्र हे मंत्राने सिद्ध होते अशी धारणा प्राचीन काळी होती. अंतर्धान म्हणजे गुप्त होणे होय. अर्थातच गुप्त होण्याकरिता लागणारी युक्ती कुबेराने अर्जुनाला शिकविली असावी. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या सूचनेवरून खांडववन जाळण्यास प्रारंभ केला तेव्हा मात्र त्याच्या विरुद्ध कुबेराने हाती गदा धारण केली होती,असा उल्लेख महाभारतात येतो. यावरून कुबेराचा नागांशी असलेला स्नेह स्पष्ट होतो. पांडव वनवासात असताना भीमाने द्रौपदीच्या आग्रहावरून कुबेराच्या उपवनातील कमळाची फुले तोडलीत. त्यावेळी भीम आणि कुबेराच्या सैन्यामध्ये झालेल्या युद्धात भीमाने त्याच्या मणिमत नावाच्या सेनापतीला ठार केले हे कळताच कुबेर रागावला आणि आपल्या सैन्यासह युद्धस्थळी आला, परंतु पांडवांना पाहताच त्याच राग निवळला आणि त्याने त्यांचा आदर सत्कार केला. या सर्व कथा उत्तरकालीन असल्या तरी त्यामधून कुबेराचा प्रभाव दिसून येतो. कुबेराची उपासना करणारे लोक मोठ्या प्रमाणात प्राचीन भारतात होते. त्यामुळे त्याच्या मूर्ती व उपासना विधीही तयार झाले होते.
कुबेराच्या मूर्ती व उपासना
यक्षांचा राजा कुबेर याचा उल्लेख कुवेर असाही केला जातो. प्राचीन ग्रंथांमधील त्याच्या वर्णनानुसार तो गोरा असून त्याला तीन पाय व आठच दात आहेत. हे वर्णन प्रतिकात्मक आहे हे स्पष्टच दिसते. इतरांपेक्षा तो अधिक शक्तिवान असल्यामुळे त्याला तीन पायाचा म्हटले असावे. त्याचे आठ दात अष्टसिद्धीचे प्रतीक आहेत,त्या सिद्धी म्हणजे, अणिमा, महिमा,लघुमा,गरिमा, प्राप्ती प्राकाम्य,वशित्व आणि ईशित्व ह्या होत. हेमाद्रीपंताने कुबेराच्या मूर्तीविषयी म्हटले आहे,ते असे-
कर्तव्यः पद्मपत्राभो वरदो नरवाहनः I
चामीकराभो वरदः सर्वाभरणभूषितः I
लम्बोदरश्चतुर्बाहुर्वामपिङ्गललोचनः I
( कुबेर हा कमलपत्राच्या कांतीचा असून त्याचे वाहन नर आहे. सुवर्णाप्रमाणे तेजस्वी ,सर्वालंकारांनी भूषित,लंबोदर,चार हात असलेला,डावा डोळा पिंगट असलेला आणि वरदमुद्रा धारण करणारा ,अशी त्याची मूर्ती बनवावी असे हेमाद्री म्हणतो.) नरवाहन अशी कुबेराची ओळख असली तरी हत्ती,घोडा,बकरा,रथ,सिंह किंवा नर ही त्याची वाहने असल्याचे उल्लेख काही ग्रंथांमध्ये येतात. यक्ष संस्कृतीवर सखोल संशोधन करणारे डॉ.आनंद कुमारस्वामी यांनी कुबेराचे वाहन नर नव्हते असे म्हटले आहे. कुबेर शिवभक्त होता. त्याचे व शिवाचे स्थान कैलास होते, यावरून दोघांमधील संबंध स्पष्ट होतो. देवपूजेनंतर मंत्र पुष्पांजली म्हणण्यात येते. तीमध्ये ‘ कुबेराय वैश्रवणाय ‘ या शब्द संह्तीने त्याचा उल्लेख केलेला आढळतो. त्याला या ठिकाणी राजाधिराज, महाराज,कामेश्वर इ.विशेषणे दिली आहेत. कुबेराची आराधना ‘ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्यसमृद्धी मे देही दापय स्वाहा’ या पस्तीस अक्षरी मंत्राने केली जाते. त्याचप्रमाणे ‘ ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्वौ क्लीं वित्तेश्वराय नमः’ या मंत्रालाही कुबेरमंत्र म्हटले जाते.
ब्राह्मण धर्मामध्ये कुबेराचे स्थान उपदेवता असे आहे. त्यामुळे ब्राह्मण धर्मातील ग्रंथांमध्ये त्याचे वर्णन दुय्यम स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. कुबेराच्या उपासकांची पिछेहाट झाल्यावर मंदिराच्या बाहेरील भिंतीवर दाखविलेल्या अष्टदिक्पालांमधील एक दिक्पाल एवढेच त्याचे स्थान राहिले. यक्षांना दुय्यम स्थान देण्याच्या हेतूने त्यांना मंदिरे,लेण्या तसेच इतर पूजास्थानांमध्ये भारवाहक म्हणून दाखविले गेले. प्रचलित हिंदू धर्मामधून बाद झालेल्या कुबेराला जैन व बौद्ध धर्मांमध्ये मात्र पूजनीय स्थान आहे. नेमिनाथ तिर्थंकाराचा यक्ष या नात्याने जैन धर्मीय कुबेराची पूजा करतात. त्याला तेथे चार शिरे व आठ हात असतात. महाकोशल भागात प्राचीन काळात कुबेर पूजा प्रचलित होती,त्यामुळे तेथे कुबेराच्या मूर्ती आढळतात. बौद्ध धर्मात कुबेर हा धर्मपाल ,पीतवर्ण व त्रिशूलधारी मानला जातो. पुष्पक,हत्ती किंवा सिंह हे त्याचे वाहन आणि वसुंधरा ही त्याची शक्ती व मुंगूस हे त्याचे अभिज्ञानचिन्ह आहे. त्याने नागांवर विजय मिळविल्याचे प्रतिक म्हणून त्याच्या हाती मुंगूस असतो असे लामा मानतात. बौद्ध धर्मात कुबेराला जंभल आणि पंचिक या नाबांनीही संबोधले जाते. त्याच्या सोबत हारिती यक्षिणी दाखविली जाते. अजिंठ्यासह अनेक बौद्ध लेण्यांमध्ये पंचिक व हारिती यांच्या कोरीव मूर्ती दिसतात. गांधार शैलीतील अशी एक मूर्ती अतिशय लोकप्रिय ठरली आहे. हारिती ही प्राचीन निर्रुती या आद्य मातृदेवतेचे बौद्ध रूप असून कुबेराच्या पूर्वी निर्रुतीची पूजा आश्विनी अमावस्येला केली जात असे. वैदिकांनी तिच्याविषयी बदनामीची मोहीम चालविल्यामुळे तिला अलक्ष्मी असे नाव प्राप्त झाले व तिची पूजा न करता तिला दिवाळीच्या रात्री घराबाहेर घालवविण्याचा विधी वैदिकांनी प्रचलित केला. त्यामुळे तिची पूजा करण्याची प्रथा मागे पडून कुबेराची पूजा सुरु झाली. कालांतराने कुबेरालाही मागे पाडून विष्णुपत्नी लक्ष्मी पूजनीय ठरली,आणि ती अजूनही आहे.

Leave A Reply