नाना फडणवीसाने ठेवलेल्या रखेल्यांचा यादीचा एक कागद

0

१९३४ साली पेशवे दफ्टराचे संशोधन करण्यासाठी त्यावेळच्या मुंबई सरकारने रियासतकार सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली एक इतिहासपारंगत विद्वानांचे मंडळ नेमले होते. रियासतकारांना सहाय्यक म्हणून आमचे परममित्र प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी ह्यांची नेमणूक केली होती. त्यांनी स्वतः आम्हा सांगितलेली ही गोष्ट त्यांच्या हयातीत आम्ही प्रसिद्ध करू शकलो नाही. कारण, तशी त्यांची आम्हाला आज्ञा होती. काय झाले की, एक दिवस या सर्व संशोधकांना पेशवे दफ्टरात नाना फडणवीसाने ठेवलेल्या रखेल्यांचा यादीचा एक कागद अचानक पणे मिळाला. तो सर्वांनी एकत्र मिळून मिटक्या मारत वाचला नि त्याची जाहीर नोंद करण्याचेही सर्वानुमते ठरले. तथापि हा कागद जेव्हा सरदेसाई शोधायला गेले तेव्हा तो बेपत्ता झाल्याचे त्यांना आढळले, सरकारी दफ्टरातुन बाहेर कागद नेणे तर अशक्य होते. मग हा कागद नाहीसा कसा झाला. त्याची हकीगत आमचे मित्र नाना कुलकर्णी गंभीर चेहरा करून सांगत की, “अहो, आमच्यापैकी एकाने हा कागद बसल्या-बसल्या त्याचे बारीक तुकडे करून सरळ गिळून की हो टाकला !” जणू काही नाना फडणविसाच्या रखेल्याची यादी प्रसिद्ध झाली असती तर सदर इसमाच्या बापजाद्यांची बेअब्रू झाली असती !
“नाना फडणवीसांच्या ‘रखेल्यां’ गिळंकृत करणारा हा माणूस इतिहास संशोधक म्हणून महाराष्ट्रात विद्यमान आहे . आपल्याला अनुकूल असेल तेव्हढाच पुरावा ठेवायचा नि बाकीचा नष्ट करून टाकायचा ही महाराष्ट्रातल्या इतिहास संशोधकांची इतिहासघातूक प्रवृत्ती इतिहासामध्ये राजवाड्यांपासून चालत आलेली आहे. हाच महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्य संशोधनाला खरा शाप आहे.”

( कर्हेचे पाणी – आचार्य अत्रे )

निशांत यांच्या कमेंटमधून

Leave A Reply