नृसिंह-विनायकाची आगळी-वेगळी मूर्ती

0

नृसिंह-विनायकाची आगळी-वेगळी मूर्ती
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात भू या नावाचे एक गाव आहे. शिल्पा हडप या विदुषीने तेथील नृसिंह-विनायकाची आगळी-वेगळी मूर्ती प्रकाशात आणली. बुलेटीन ऑफ द डेक्कन कॉलेज,.७२-७३(२०१२-१३)
या संशोधन पत्रिकेतील पृ.२६७ वर त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झालेला आहे. मानवी शरीर आणि पशुचा चेहरा असलेल्या अनेक मूर्ती आपणास भारतात पहावयास मिळतात. हत्तीचे मुख असलेल्या मूर्ती प्राचीन काळापासून निर्माण होत आहेत. परंतु सिंह आणि हत्तीच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेली ही मूर्ती मात्र आगळी-वेगळी आहे.

तिचे डोळे सिंहासारखे उभे कोरण्यात आलेले आहेत. भू येथील लक्ष्मीकांत मंदिरात असलेल्या या मूर्तीचे कान लहान आहेत. हत्तीपेक्षा तिचे साधर्म्य सिंहाशी अधिक आहे. परंतु सोंडेवरून आपण ती गणेशाची आहे, हे समजू शकतो. हत्ती व सिंह या दोन्ही प्राण्यांची शक्ती आपणास लाभावी या हेतूने या मूर्तीची निर्मिती केली गेली असावी. तिला चार हात असून त्यापैकी वरच्या उजव्या हातात शंख, डाव्या हातात चक्र तर खालील उजव्या हातात असलेल्या खाद्यपदार्थाकडे सोंड वळलेली आहे. या मूर्तीच्या हातातील शंख आणि चक्र हे विष्णूचे प्रतिक आहेत,तर खाद्यपदार्थ आणि त्याकडे वळलेली सोंड हे गणपतीचे. विष्णू आणि गणेशाच्या एकत्रीकरणाचे स्पष्टीकरण देणारी कथा पुराणांमध्ये आलेली आहे.
एकदा विश्वदेव गौरीकडे येऊन भगवान विष्णूच्या दर्शनाशिवाय फळे खायला नकार देतो,तेव्हा गणेश आपले मूळ स्वरूप टाकून विष्णूच्या रुपात त्याच्यासमोर येतो. तेव्हा विश्वदेव त्याला आपला पूर्वज म्हणून स्वीकारतो. त्यानंतर गणेश आपल्या मूळ रुपात परत येतो आणि त्याचे भक्त गणेश आणि नारायणाची पूजा करीत आहेत असे दृश्य दाखवितो. ते पाहून विश्वदेव त्यांच्यामध्ये काही फरक नाही हे मान्य करतो. ब्रह्मवैवर्त पुराणात याचे स्पष्टीकरण करणारी वेगळी कथा आहे. या कथेनुसार पार्वती पुत्रप्राप्तीकरिता शिवाच्या सल्ल्यानुसार पुण्यक व्रत करते,त्यामुळे श्रीहरी तिला प्रसन्न होऊन श्रीकृष्ण तुझ्या पोटी जन्म घेईल आणि तो भूतांचा राजा होऊन गणेश या नावाने प्रख्यात होईल असा वर देतो. सर्व प्रकारच्या विघ्नांना तो दूर करील आणि विघ्न- निघ्न, लंबोदर, एकदंत आणि गजानन या नावांनी ओळखला जाईल असे तो म्हणतो.
या तशाच या सारख्या कथांमधून गणपतीच्या अशा रूपाचे स्पष्टीकरण करणे ही पुराणिकांची प्रवृत्ती आहे. वास्तविक दोन कुलचिन्हाचे लोक एकत्र आलेत तर अशा प्रतिमा तयार केल्या जातात आणि त्यांना अवतारवादाचा मुलामा देण्यात येतो. शिल्पा हडप यांनी या मूर्तीच्या निर्मितीमागे यक्ष संस्कृतीतील दैवतांचे विनायक आणि नारसिंह या दैवतांमध्ये विलीनीकरण होणे हे कारण असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्याचप्रमाणे दोन परस्पर विरुद्ध सम्प्रदायांमधील संघर्ष संपल्याचे प्रतीक म्हणूनही या प्रतिमांकडे पाहिले पाहिजे असे म्हटले आहे. यावरून आपणास प्राचीन यक्ष संस्कृतीचा परिचय व्हायला मदत होते, कुमारस्वामी यांच्या यक्ष संशोधनाला आज सर्वत्र मान्यता मिळाली आहे. याउलट फादर हेरास यांचे मत फारसे स्वीकारले गेले नाही.
आनंद कुमारस्वामी यांचा गजमुखी यक्ष
आनंद केंटीश कुमारस्वामी यांचा जन्म २२ ऑगस्ट १८७७ रोजी कोलंबो येथे तर मृत्यू ९ सप्टेंबर १९४७ रोजी अमेरिकेतील निध्याम येथे झाला. श्रीलंका आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व त्यांनी स्वीकारले होते. इंग्रजी आई आणि हिंदू वडील यांच्या पोटी आलेल्या या महान प्राच्यविद्यासंशोधकाने कला,इतिहास,संस्कृती या क्षेत्राला आपल्या लेखनाने समृद्ध केले आहे. ‘डान्स ऑफ शिवा ‘ हा त्यांचा नटराजाच्या मूर्तीचे स्पष्टीकरण करणारा ग्रंथ कलास्वादासाठी उपकारक ग्रंथ ठरला आहे,तर यक्षावरील त्यांची दोन पुस्तके यक्षांच्या महान संस्कृतीला न्याय देणारी आहेत. यक्ष-भाग

यक्ष-पार्ट १ हा त्यांचा प्रस्तुत विषयावरील पहिला ग्रंथ वाशिंग्टनच्या स्मिथ्सोनिअन संस्थेने १९२८ मध्ये प्रकाशित केला . या ग्रंथातील पृ.७ वर आंध्रप्रदेशमधील अमरावती या प्राचीन गावातील बौद्ध स्तूपाच्या अवशेषात आढळलेल्या गजमुखी यक्षाच्या प्रतिमेवरून गजाननाचे मूळ या प्रतिमेत आहे हे सिद्ध केले. त्याच्या मोठ्या पोटावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला. यक्षाचा राजा कुबेर किंवा मणीभद्र यक्षासारखे त्याचे रूप आहे असे ते म्हणतात. ई

ई.स.पूर्व १०० ते २०० या कालावधीत निर्माण झालेल्या या स्तूपाचे मूळ स्वरूप आज शिल्लक नाही. तरीही तेथील अवशेषांवरून त्याच्या भव्यतेची जाणीव आपणास होते. येथे आढळलेली गजमुखी यक्षाची प्रतिमा सर्वात जुनी असल्यामुळे गजाननाचे ते आद्य रूप आहे असे अभ्यासक मानतात. राजस्थानातील जयपूर जवळील रेढ या पुरातत्वीय स्थळी ई.स.पूर्व पहिल्या शतकातील गजमुखी यक्षप्रतिमा आढळली आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील मथुरा येथील शिलापट्टावर गजमुखी यक्षाची प्रतिमा प्रतिमा आहे त्यानंतर गजाननाच्या मूर्ती बनविण्याची प्रथा पडली.महाराष्ट्रातील वेरूळ येथील बौद्ध गुहेत गजमुखी यक्ष दिसून येतो. चीनमधील मोगावो गुहेमध्येही गजमुखी गणेशाची मूर्ती ई.स.सहाव्या शतकात कोरण्यात आली. पाचव्या-सहाव्या शतकातील गुहांमध्ये आढळलेल्या गणेश मुर्तीवरही यक्ष प्रतिमांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे कुमारस्वामी यांनी मांडलेल्या गजमुखी यक्षाच्या संशोधनाचे महत्व पटल्याशिवाय राहात नाही.
——————- ashokrana.2811@gmail.com

Leave A Reply